तुह्या धर्म कोनचा ?

डिसेंबर 8, 2012 4 comments

मराठी चित्रपट नुसता उभारीच घेत नाहीये तर वेगवेगळे प्रगल्भ विषय हि मांडतोय जे कि कुठल्याही हिंदी किंवा प्रादेशिक भाषांमध्येही अपवादानेच मांडले जात असतील .श्वास पासून सुरु झालेली हि मालिका आज मराठी चित्रपटांची उंची वाढवतच चालली आहे उमेश –गिरीश ,गजेंद्र अहिरे, सतीश मन्वर ,मंदार देवस्थळी यांसारखे दिग्दर्शक , संदीप कुलकर्णी ,उपेंद्र लिमये ,सचिन खेडेकर ,सुबोध भावे ,अमृता सुभाष,शरद पोंक्षे ,किशोर कदम यांसारखे मुरलेले अनेक कलावंत आणि सगळेच उत्कृष्ट गीतकार संगीतकार यामुळेच या चित्रपट सृष्टीला नवे चैतन्य आले आहे .
गाभ्रीचा पाउस ,देऊळ ,जोगवा ,या सारख्या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या अजून एका चित्रपटाची निर्मिती होतीय. विषय आधी कधीच हाताळला गेला नाहीये .चित्रपट आहे “तुह्या धर्म कोनचा ?”

उपेंद्र लिमये ,किशोर कदम ,विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सरळ धर्म आणि त्याच्या संकल्पना यांच्यावर प्रहार करणारा असा वाटतोय .

विविध धर्माचे विविध देव आणि त्यांच्या रंगविलेल्या अजब दंतकथा ,खरा देव कोणता यातील संघर्ष आणि आदिवासी समाजाकडून त्यांकडे बघण्याची दृष्टी .
हे सगळेच या चित्रपटामध्ये उत्तम मांडले असणार हे याच्या ट्रेलर मधूनच दिसते आहे ..गाभ्रीचा पाउस चा दिग्दर्शक सतीश मन्वर याचेच दिग्दर्शन या चित्रपटासाठी आहे . हा चित्रपट सर्व चित्रपट सृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल यात कुठली शंकाच नाही .आमच्या फुल to फिल्मी टीम कडून या चित्रपटाला खूप शुभेच्छा .

Advertisements

“धुनी”

328d8b3ab24f498dae5db3e4c3d99255

महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि राज्य पुरस्कारप्राप्त सुप्रसिध्द कवी डॉ सुरेश सावंत यांचा “धुनी” हा नवीन कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे .

रम्य धुंद कल्पनेत न हरवता कधी जळजळीत तर कधी आशादायी वास्तविकतेची जाणीव त्यांच्या कवितांमधून नेहमीच आपल्याला दिसते ,भावते .

कवितेला नमन करणाऱ्या ‘कविते’ या सुंदर कवितेपासून काव्यसंग्रहाची सुरुवात होते.

देशात माजलेली धर्मांधता जातीय, धार्मिक दंगली त्यात गढूळ झालेले वातावरण पाहून उद्विगतेने “खरच बुद्ध याच देशात जन्माला आला होता ?”हा प्रश्न ते आपल्या काव्यातून देशाला विचारतात .

शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाने त्रासलेल्या जनतेसाठी ओवींच्या स्वरुपात उपहासात्मक लिहिलेले ”हवेत कशाला|दारू परवाने | विद्येची दुकाने प्रतिष्ठित ||” काव्यही मस्तच.

सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी राजकारण्यांनी तत्वे मोडून केलेली छुपी अभद्र युती याचा समाचार हि कवी “दिलजमाई ” कवितेतून घेतात .

तसेच “विकार”,”चेहरे” मधून रंगवलेले ढोंगी मुखवटे हि आपल्याला विचार करायला भाग पडतात .

सतत “माणसात देव शोधा ”,”जातीपाती मोडा” सांगणाऱ्या महापुरुषांचे हे खोटे दैवतीकरण केले गेले त्यांना एका जातीच्या बंधनात अडकवले ,त्यांचे जिवंत विचार न अंगीकारता फक्त त्यांचे निर्जीव पुतळेच उभे केले . या संकुचित समाजाचे सुरेशजींनी “पुतळे ”या व्यंगात्मक कवितेत वर्णन केले आहे .

स्वतःला मुत्सद्दी समजणारे लोक समस्यांवर तोंड गिळून गप्प असतात त्याचं खरेपण दाखवणारी ‘मुत्सद्दी’ हि चारोळी ,तर दुष्काळात होरपळून निघालेली जनता कवी ‘दुष्काळ ’या काव्यातून मांडतात .

“पूर्वी पोलीस खायचे ,आता शिक्षण खाते ”हे वास्तव मांडणारी ‘शिक्षणाच्या नावानं ’ हि कविता राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेले मुख्याध्यापक म्हणजेच स्वतः कवी यांना हि कैफियत का मांडावी वाटली असेल याचेच कारण आजच्या शिक्षणाच्या गढूळ वातावरणात आहे .आधी मुलांना समरसून शिकवणारे साने गुरुजी आता कुठेच दिसत नाहीत सगळेच आता “नाणे गुरुजी” झाले आहेत.

देशातली दयनीय अवस्था ,भ्रष्टाचार अधिकारी आणि राजकारणी दोघांचाही ,हुंडाबळी ,बलात्कार,दरोडे,स्त्री भ्रूण हत्या या समस्यांनी गांजलेल्या समाजाविषयी सतत कवीच्या मतात “धुनी” सतत धुपत आहे ,यातूनच या कविता जन्माला आल्या आहेत .खरे तर आपल्या सगळ्यांच्या मनातील प्रश्नांनाच कवीने कवितेच्या मार्गाने वाट दिली आहे .

इंडिया शायनिंग आणि समर्थ भारत चा नारा देणाऱ्या घोषणा वरवरच्या आणि दुबळ्या आहेत .समाज हे राष्ट्र तेव्हाच बनू शकते जेव्हा ते एकसंध ,निष्कलंक आणि सुधृढ बनेल .आणि हे नक्कीच होईल याविषयी कवी आशादायी चित्र काव्यात्मक स्वरुपात सांगतो “तांबडं केव्हा फुटेल? ”या समारोपाच्या कवितेतून .

पुस्तकाची छपाई ,कागद ,बांधणी,मुखपृष्ठ सर्वच गोष्टी सर्वच उत्तम .

प्रखर विचार,विदारक समस्या आणि त्यांची उत्तरेही या कवितांमधून आपल्याला सापडतील. या विचारांची धुनी आपल्या मनात सतत ठेवावीशी वाटत असेल आणि “ आणखी किती काळ,कानावर हात ठेवायचे का बुडवणाऱ्या दलदलीत आपले पाय रोवायचे? ” याचे उत्तर पाहिजे असेल तर नक्की हा कवितासंग्रह वाचा .

धुनी (कविता संग्रह) कवी :डॉ सुरेश सावंत ,प्रकाशक :शब्दालय प्रकाशन ,किंमत २०० रु/-.

(हे पुस्तक आपल्याला बुकगंगा. कॉम वरही विकत मिळेल. )

http://www.bookganga.com/eBooks/Book/4880930475231155158.htm?Book=Dhuni

धन्यवाद वाचक रसिक हो !!!!

नोव्हेंबर 21, 2012 4 comments

खूप खूप धन्यवाद वाचक मित्रांनो !!!

मी काही लेखक वगैरे नाही पण वाचक रसिक जरूर आहे,
मराठवाड्यातील आम्ही काही मंडळींनी एकत्र येवून रसिक रंजन हा समूह स्थापन केला कला ,साहित्य आणि संगीत यांचे आम्ही रसिक .ह्या आमच्या समूहाचा अंतरजालावर काहीतरी सहभाग असावा या हेतूने आम्ही रसिकरंजन संकेत स्थळाचे काम सुरु केले .व फेसबुक वर ग्रुप हि स्थापन केला . कला साहित्य संगीत याविषयी मराठीतून खूप चांगले चांगले ब्लोग्स लिहिले जातात .ते चवीने वाचलेही जातात .पण बरेच मराठी नेट युजर्स त्या ब्लोग्स पर्यंत पोचू शकत नाहीत .
त्यामुळेच संगीत साहित्य विषयी छान छान माहिती असलेले ब्लोग्स पोस्ट एकत्र करून त्याचा एक ई दिवाळी अंक बनवायचा आणि तो सर्व मराठी नेट युजर्स पर्यंत पोचवायचा असा प्रयत्न केला तो मोठ्या प्रमाणात यशस्वी हि झाला .आम्हाला, लेखकांना पसंतीची पावतीही मिळाली अर्थात लेखकांनी आणि कवींनी दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले ..खूप लोकांना अश्या ब्लॉग्सची आणि ब्लॉगर्स ची हि ओळख झाली ,सर्व लेखांच्या खाली ब्लोग लेखकाच्या ब्लोग चा पत्ता हि आवर्जून देण्यात आला त्यामुळे त्यांचे इतर ब्लोग्स हि लोकांना वाचता आले .
काही जणांच्या बहुमोल सूचना हि आल्या .त्या पुढच्या वेळेस नक्की अंमलात येतील .
हे सर्व उत्तम मराठी लेख आणि कविता सर्वांपर्यंत जाव्यात या साठी रसिक रंजन नेहमीच प्रयत्नशील राहील .दर महिन्यात आता ई -मासिक काढावे अशाही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्याविषयी नक्की विचार करण्यात येईल .कुणाला जर त्या साठी आपले लिखाण पाठवायचे असल्यास onkar.rsk@gmail.com किंवा     rasikrnjn@gmail.com या पत्त्यावर पाठवावे.
रसिक रंजन चा ई- दिवाळी अंक वाचवायचा असल्यास इथे वाचावयास मिळेल व डाउनलोड हि करता येईल    .http://www.rasikranjan.com/rasikranjan.pdf

पहिलं नमन !!

नोव्हेंबर 12, 2012 3 comments

प्रथम ,सर्व रसिकजनांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
रसिक रंजन चा पहिलाच ई दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा या वेळेस प्रयत्न केला आहे , पूर्वी घरोघरी काही विशेष दिवाळी अंक विकत घेऊन वाचले जायचे. काळाप्रमाणे आता ई दिवाळी अंक सुरु झाले आहेत .आम्ही दर महिन्याला ई मासिक सुरु करण्याचा विचार केला होता त्यातूनच हि कल्पना पुढे आली .रसिक रंजन हा मराठवाड्यातील काही रसिक मंडळीनी एकत्र येवून साहित्य-कला-संगीत यांच्या रसिकांसाठी सुरु केलाला एक समूह .या समूहातील उपक्रमाची माहिती अंतरजालाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचावी .यासाठी फेसबुक वर समूह बनविण्यात आला तसेच http://www.rasikranjan.com या संकेत स्थळाचे कामही सुरु आहे.
पहिलाच दिवाळी अंक असल्यामुळे कुठलीही एक संकल्पना न ठरवता सर्व प्रकारचे लेख आणि कविता आम्ही यात प्रकाशित केले आहेत ,उत्तम ब्लॉग्स लेखक, रसिक रंजन च्या समूहामधील सदस्य ,तसेच मराठवाड्यातील नामवंत कलावंत यांचे लेखन या अंकात प्रकाशित केले आहे .व सर्व लेखकांनीही आम्हाला लगेचच ते लेखन छापण्याची परवानगी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत .(Thanks a Lot Mahendra kaka, Ninad ,Saourabh,Mayur and sachin )
संकेत कुलकर्णी, रोहित आंबेकर ,अनिरुद्ध आढे , यांनीही तांत्रिक बाजू सांभाळून घेतली त्याबद्दल त्यांचे हि आम्ही आभारी आहोत.
आशा आहे कि हा पहिलाच प्रयत्न आमच्या वाचकांना आवडेल.
(सूचना :अंकामधल्या लेखाचे अथवा कवितेचे पूर्ण हक्क लेखक व कवी यांचे कडे राखीव आहेत ,कुठलाही लेख अथवा कविता मजकूर घ्यावयाचा असल्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.)

सिक रंजन दिवाळी अंक २०१२

रसिक रंजन ई- दिवाळी अंक

नोव्हेंबर 8, 2012 १ प्रतिक्रिया

या दिवाळी निमित्त प्रथमच रसिक रंजन या समूहाचा पहिला ई-दिवाळी अंक प्रकाशित करत आहोत .खरतर प्रायोगिक प्रयत्नच आहे .
मराठी ब्लोग विश्व च्या कुठल्या सदस्याला आपला लेख ,कविता किंवा इतर साहित्य दिवाळी अंकासाठी पाठवायचे असल्यास onkar.rsk@gmail.com या पत्त्यावर पाठवा सोबत आपल्या ब्लोग चा पत्ताही द्या ,तो हि आपल्या साहित्य सोबत प्रकाशित केला जाईल ..
साहित्य पाठवायची मुदत ८ तारखेपर्यंतच आहे .

प्रवर्ग: Uncategorized

Rasik Ranjan News

Image

प्रवर्ग: Uncategorized

जीवन उणे संगीत बरोबर शून्य !

जीवन उणे संगीत बरोबर शून्य !
-डॉ. मुकुंद देवळालीकर .

 

“ए आई मला झोप येत नाहीये गाणे म्हण”
असे लहान मुल म्हणताच आई त्या मुलाला थोपटीत असताना गीत म्हणते ,त्यातला गोडवा ,त्यातली लय आणि त्यातला जिव्हाळा या त्रिवेणी संगमातून बाळ केव्हा झोपी जाते हे दोघांना समजत नाही ,हा महिमा आहे त्या अंगाई -गीताचा त्यातील लयबद्ध संगीताचा .चित्रपटाला असणारे संगीत हे त्या त्या कलेची रंजकता वाढवते .संगीत मनाला भुरळ घालते मनाला रिझवते .
संगीतात ३ सप्तके आहेत मंद्र ,मध्य ,तार .आपल्या जीवनामाधेतीन अवस्था आहेत बालपण,तरुणपण,म्हातारपण .आपला स्वभाव,वर्तन हे तीन गुणांवर अवलंबून असते सत्व,साज,तम .जीवन हे संगीताशी बऱ्याच अर्थाने मिळते जुळते आहे .सा,रे,ग,म,प,ध,नि हि संगीताची जुळून आली तर जीवनात आनंद मिळतो .संगीत हे आळवावे लागते ,जीवन हे जुळवावे लागते,बेसूर संगीत,ताल,लय सोडलेले संगीत कर्णमधुर तर नुसतेच उलट रस भंगच होत असतो.
भजन असो,कीर्तन असो,सांस्कृतिक कार्यक्रम असो टीव्ही मालिका असो,चित्रपट असो त्यातल्या गाण्याने संगीताने माणूस मनापासून डोलतो .क्षणभर तो त्याच्या वेदना -त्याचे दुःख विसरतो.त्याचे मन प्रफुल्लीत होते आणि मनच शरीर निरोगी ठेवते ,रोग बरा करते…
कुणाला नाट्यसंगीत,कुणाला शास्त्रीय तर कुणाला सुगम संगीत आवडते .आवड काही का असेना त्याने मनाची करमणूक होते हे महत्वाचे .
मंदिरातली घंटा वाजताच आपण भक्ती रसात डुम्बतो,गायकाचे गायन जसे जसे रंगात येते तसा माणूस डोलतो .एवढी शक्ती त्या संगीतामध्ये आहे ,संशोधनाने सिध्द झाले आहे कि दुभत्या जनावराची धार काढताना कर्णमधुर संगीत लावले तर जनावरे लवकर आणि जास्त पान्हावतात .हि महती आहे संगीताची ,आणि हे भगवान श्रीकृष्णाच्या बासरीपासून आज तागायात आले आहे ..
बालकांचे बोबडे बोल ,त्याची बोलण्याची लय हि कर्णमधुर च असते .प्रवचनकार ,वक्ता यांचे लयबद्ध भाषण लोक ऐकत बसतात त्याचे कारण त्याच्यातल्या संगीतातली गोडी वक्तव्याला चढ-उतार म्हणजेच आरोह अवरोह मनाला भावतात.
सकाळी भूपालीच्या स्वरांनी प्रसन्न वाटते, थाप मग ती ढोलकी वरची असो ,डफावरची कि मृदुंगावरची मान डोलायला लागते ,टाळ -झांझ वाजवत मंत्रमुग्ध करणारी देवाची आरती मन प्रफुल्लीत करते , दारात मांडव आणि सनई चे संगीत सुखावते मंगलमय वातावरण तयार करते , कुस्ती फडामध्ये उफाड्याच्या किंवा हलगीच्या आवाजाने मल्लांमध्ये सुद्धा स्फुरण चढते ..
अगदी निसर्ग सुद्धा विशिष्ठ संगीताने माणसाला रिझवतो -पावसाची गती, त्यातून निघालेला आवाज ,उंच धबधब्यावरून फेसाळत पडणारे पाणी लयबद्ध आवाज करीत कोसळते .नदीच्या पाण्याचा खळखळणारा आवाज, वाऱ्याची शिळ यातही मनमोहक संगीत आहे .
संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,संत नामदेव ,गोरोबा काका ,एकनाथ महाराज भजन गाताना तल्लीन व्हायचे कदाचित संगीतातल्या देवत्वाचीच त्यांना जाणीव होत असावी .
स्त्री जीवनातील प्रत्येक कार्यक्रम,सण,उत्सव गाण्याशिवाय साजरा होतच नाही .
मोट हाकताना ,कापणी करताना गायले जाणारे ‘भलरी गीत ‘शेतकरी दडला हुरूप देते ,कष्ट विसरायला लावते .हा सर्व संगीताचा चांगला परिणाम .
प्रत्येक जण आपआपले प्रश्न व्यवसाय,नौकरी त्यातल्या समस्या सगळे संगीतापुढे विसरून जातो . आपल्या नाडीचे लयबद्ध ठोके ,हृदयाची लयबद्ध गती,हातीची धडधड ,कुरकुरणारे शरीर ,आपली चालण्याची पद्धत या सर्वांत संगीत आहे .
थोडक्यात काय तर आयुष्याच्या वाटेवरच्या वळणावर संगीत जीवन खुलवते ,रिझवते हि किमया आहे संगीताची .
काही ठराविक प्रसंग त्या त्या संगीताने आठवतात ,कधी कधी तेच संगीत आवडेनासे होते भेसूर वाटते पण हे सगळे संगीताच्या अस्तित्वानेच . म्हणजेच आपल्या जीवनात पदोपदी संगीताची आवश्यकता आहे ,”म्हणूनच जीवन उणे संगीत बरोबर शून्य ” वाटते,भासते …..

डॉ. मुकुंद देवळालीकर
५, अष्टविनायक विहार ,
वरद कॉलनी,अहमदनगर .
(डॉ. मुकुंद देवळालीकर हे प्रख्यात लेखक ,अभिनेते ,संगीतकार राज्य नाट्य परिषदेचे परीक्षक आहेत .)