ज्येष्ठ पत्रकार, संपादक अरुण टिकेकर यांचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ हे पुस्तक प्रत्येक पुस्तकप्रेमीकडे असणे म्हणजेच टिकेकरांच्या भाषेत ग्रंथसंग्रहाकाकडे आवश्यकच आहे! इतके ते सुंदर आहे .. पुस्तकातलं प्रस्ताविकानंतरचे पहिलच वाक्य ” माणसं ग्रंथांची जागा घेऊ शकत नाहीत, पण ग्रंथ माणसांची जागा घेऊ शकतात” अजून मनात कोरून बसलं आहे.
ग्रंथशोध आणि वाचनबोध या दोन प्रकरणात विभागलेले हे पुस्तक. त्यात ग्रंथ शोध मध्ये त्यांनी ग्रंथवाचन आणि मदिराप्राशन यांमुळे चढणाऱ्या कैफाचा फरक फार सुंदरपणे सांगितला आहे. त्यांच्या दुर्मिळ पुस्तके जमविण्याच्या छंदाविषयीही मस्त लिहिले आहे. अशी दुर्मीळ पुस्तके मिळवण्यासाठी केलेली धडपड त्यातून महाराष्ट्र गुजरात आणि इतर राज्यातही असणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांशी झालेली मैत्री याविषयी फार रंजकपणे लिहिले आहे.
वाचनबोध हे प्रकरण तर भारीच! पुस्तकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या अस्वादकांची प्रकार आणि वर्णने जसे की पुस्तक दिले की पुस्तकांचा फडशा पडणारी एक एक पुस्तक आस्वाद घेऊन वाचणारी, चोखंदळपणे पुस्तके निवडणारी, किंवा पुस्तके न वाचताही त्यावर टीका/कौतुक करणारी असली वाचक मंडळी छान नर्मविनोदी पद्धतीने सांगितली आहेत. या प्रकारणातला वाचन-गुरू हा शब्दप्रयोग मला खूप भावला त्याचे महत्वही त्यांनी सांगितले आहे!
तर असे हे छोटेसे फक्त 173 पानांचे पण पुस्तकप्रेमीचे सार सांगणारे पुस्तक आपल्या संग्रही नक्की ठेवा! तुम्हा सर्वांना “ग्रंथसंग्रहाक” आणि “ग्रंथ आस्वादक” बनण्यासाठी शुभेच्छा !